५ सप्टेंबर शिक्षक दिन
आदरणीय शिक्षक बंधू-भगिनी यांस,
सर्वप्रथम आपणा सर्वांचे मनापासून आभार व कौतुक.
आपण गुरुजन वर्गाने आम्हा पामरांना उत्तमोत्तम शिकवून शहाणे केले,समाजाला एक विशिष्ट उंची निर्माण करुन दिली याबद्दल आपले आभार व कौतुक यासाठी कि सातत्याने आपण मुलांना नवीन काही देऊन,योग्य संस्कार रूजवून नवीन जबाबदार पिढी घडवत आहात याकरिता.
समाजात अपेक्षित बदल घडवणे,शिक्षणातून उत्तम नागरिक उभे करणे,भारतास वैचारिक सुदृढता निर्माण करुन देणे अशी विविध स्वप्ने उराशी बाळगून कार्य करणारे आपण आदर्श शिक्षक आहात.वाड्या,वस्त्या,नद्या,जंगल पालथी करून शिक्षणाची गुढी उभी करणारे आपण प्रामाणिक गुरुजन आहात.
शाळेतील प्रत्येक मुल माझे आहे,हि शाळा माझी-हा गाव माझा अशी आत्मियता आपणात पाहण्यास मिळते तेव्हा खरे गुरू लाभल्याचा आनंद मनाला मिळतो.स्वताच्या पगारातून,समाजातील देणगीतून आपण सतत शाळा व मुले यांसाठी झटत असता हे कौतुकास्पद आहे.शिक्षणाच्या वारीतील आपण आदर्श शिक्षक आहात याचा मला ( समाजाला )अभिमान वाटतो.
आपली विद्वत्ता,भारतीय संस्कृतीचा गाढा अभ्यास व हिंदू धर्माचे तत्वज्ञान सर्व जगाला पटवून देणारे,शिक्षक ते राष्ट्रपती अशी पदे अभ्यासपूर्ण सक्षमपणे पेलणारे,सर्वप्रथम भारतरत्न हा सन्मान मिळवणारे आदर्श शिक्षक डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५सप्टेंबर.
डाॅ.सर्वपल्ली यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होणे हि अभिमानाची,त्यांच्या विद्वत्तेची,विशाल बुध्दीमत्तेची व देशासाठी दिलेल्या योगदानाची पोहच पावती म्हणावी लागेल.अशा कर्तृत्ववान शिक्षकाच्या जन्मदिनी आपणासारख्या आदर्श शिक्षकांचा सन्मान होणे म्हणजे दूधात साखरच.
शिक्षक बंधू-भगिनिंनो आज आपल्या कार्याची गोडवी समाजासमोर मांडण्याचा हक्काचा दिवस.आपण दिलेले ज्ञान,मुलांना लावलेला जीव,समाजात घडवून आणलेले बदल यामुळे आपले कौतुक रोजच घराघरात होत असते.आपल्या कार्याचा गौरव सर्वांसमक्ष व्यासपीठावर व्हावा म्हणून शासनाने निर्धारित केलेला हा शिक्षक दिन.
आपल्या कार्याचा सन्मान म्हणून आपणास आज तालुकास्तर,जिल्हास्तर,राज्यस्तर व राष्ट्रियस्तर अशा विविध स्तरावर गौरवले जाणार म्हणून आपले गोड कौतुक व अभिनंदन.
गुरुजी ( सर ) बाई ( मॅडम ) आपण आम्हास जे चांगले ते देऊन शहाणे केलात,आम्ही आज जे आहोत यात आपला सिंहाचा वाटा आहे हे तितकेच सत्य आहे.
शिवरायांनी प्रत्येक गडावर मुस्लिम सैनिकांना नमाज पढता यावा म्हणून विशिष्ट जागा उभारल्या,प्रत्येक जाती-धर्माचा आदर करत एकसमान वागणूक देणारे शिवराय.शिवरायांत हि मुल्ये रुजवणारी प्रथम शिक्षिका म्हणजे राजमाता जिजाबाई.
दलित समाजाला पंढरपूरचे विठोबा मंदिर खुले व्हावे यासाठी प्राणांतिक १० दिवस उपोषण करणारे,सर्व जाती-धर्माच्या मुलांना मातृत्वाने ज्ञानदान करणारे ,मानवतेचे उपासक साने गुरुजी यांना घडविणारी आदर्श शिक्षिका म्हणजे साने गुरुजींची आई यशोदाबाई.
माळ्याने जमीन भुसभुशीत केली,अगदी मनापासून रोपांची काळजी घेतली कि ती झाडे अवघा निसर्ग नटवून काढतात.अगदी माळ्याला शोभेल अशी समाजात शैक्षणिक मशागत करुन क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांनी शिक्षणज्योत पेटवली.घराघरात शिक्षणाचे नंदनवन असावे हे स्वप्न उराशी बाळगणा-या माळी समाजाच्या मानबिंदू म्हणजे सावित्रीबाई फुले.
गुरुजी-बाई आपणच आम्हाला समाजातील विविध अशा रत्नांची ओळख करुन दिली.आपण आमच्यासाठी नेहमीच आदर्श शिक्षक-शिक्षिका आहात.आपल्या कार्याचा गोडवा गायला जावा अशी आपली मानवता.
पण आज एक सत्य मांडताना वाईटही वाटते.काही शिक्षक शिक्षक दिनाला गालबोट लावण्याच्या उद्देशाने गेली चार-पाच वर्षे अशोभणीय लेख किंवा तुलनात्मक पोस्ट टाकत असतात.,थोर समाजसुधारक व गुणी शिक्षक यांच्यात तुलना करुन समाजात हास्यास पात्र बनत असतात याचे वाईट वाटते.एकंदरीत त्यांचे हे कृत्य असे सिध्द करते कि हे आदर्श शिक्षक नाहीतच.पण समाज आपणास गुरुजन संबोधतो याची जाण ठेवून तरी वागावे हि इच्छा. यांनी त्यांच्या शाळेत,गावात किती आत्मियतेने काम केले,समाजात कोणते स्थान मिळवले याचा विचार प्रथम करायला हवा.जर शिक्षकच अशी भेदाभेदीची,तिरस्काराची व सूडाची भावना बाळगत असतील तर ते मुलांत कोणती मुल्ये रूजवत असतील.आड्यातच नसेल तर पोह-यात येणार कोठून ? जे सर्वधर्म समभावना अंगिकारत नाहीत ते मुलांत काय समानता व मानवता निर्माण करणार हा मोठा प्रश्न आहे?
अशा काही शिक्षकांच्या लेखनाने,मेसेज पाठवण्याने सर्व शिक्षक यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो.आपण काय पेरत आहोत याचा विचार होणे गरजेचे आहे.अशा तुलनात्मक पोस्ट टाकून ते शिक्षक आपली बुरसटलेली बुध्दी, भेदभाव,वैचारिक खालावलेली पातळी याचे दर्शन घडवून समाजात हसे करुन घेत असतात.कुठे त्या महान व्यक्ती व कुठे आपण याचे आत्मचिंतन झाले पाहिजे.
मोठेपणा हा मागून मिळत नसतो हे आम्ही पामरांनी गुरुजनांना सांगावे इतपत गुरुजन लहान नाहीत.गेली चार,पाच वर्ष् समाजाने हा भेदाभेद पाहिला आहे.आशा आहे यापूढे समाजाला अधिक दर्जेदार व समानतेचे शिक्षण अनुभवण्यास मिळेल.
सातत्याने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व समाजाच्या उध्दारासाठी झटणा-या त्या सर्व आदर्श शिक्षक-शिक्षिका यांना मानाचा मुजरा व ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या आभाळभर शुभेच्छा.
समाजातील एक घटक म्हणून आपल्या कार्याचे कौतुक करणे,जे जे चांगले आपण आम्हास दिले त्याचे जतन करणे आमची जबाबदारी समजतो.आपली आदर्श शिक्षकाची जागा मनाच्या कप्प्यात नेहमीच असते,ती जागा निश्चितच फार मोठी आहे.
आज ज्या गुरुजनांना गौरवले गेले त्यांचे मनापासून कौतुक व यापूढे ज्या गुरुजनांना सन्मानित केले जाणार आहे त्यांना ह्रदयपूर्वक शुभेच्छा.
समाजासाठी प्रत्येक गुरुजन हा आदर्शच आहे.त्यांचे विचार व समाजासाठीचे योगदान येथे मोलाचे असतात.
५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या भरभरून शुभेच्छा बाई व गुरुजी.
आपला
श्री,गुरुनाथ जाधव
पंचायत समिती सदस्य
भिवंडी
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️





0 Comments: