सुचत होते, सुटले नाही, परंतु सोडणार .......
काही दिवसा पुर्वी आमच्या कॉलनीत एक मध्यम वयीन स्री डोक्यावर टोपले घेऊन दान मागतांना फिरत असतांना दिसली .माझ्यासाठी नवीन असे काहीच नव्हते कारण विशिष्ट प्रसंगी , विशिष्ट सणाच्या दिवशी खासकरून अमावस्येच्या दिवशी अश्या प्रकारच्या आई, भगिनी समान स्रीया नेहमी डोक्यावर टोपले घेऊन वावरतांना पाहिल्या होत्या ,व दान देवो ताई ,अमावस्या देवो ताई अशा प्रकारचे शब्द त्यांच्या तोंडुन बरेचदा ऐकले होते.
मी स्वतः शी ठाम निश्चय करून डोक्यावर टोपले घेऊन फिरणाऱ्या त्या स्रीशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला . त्या मातेची दान मागण्याची घाई व एकाच वेळी चार ते पाच घरांशी साधावयाची कला पाहून आश्चर्यही वाटत होते व आमच्यात होत असलेल्या संवादाला वेग सुद्धा त्याच पद्धतीने गतिमान व वेगाने होत होता .संवादात जस _जसे एकेक पान उघडत होते तस _तसे अनेक अशा घटना भराभर डोळ्यासमोरून जात होत्या .
सदर लेखन हे कोणाच्या भावना दुखावण्यासाठी नव्हे तर निरिक्षणातून व कुतूहलापोटी केलेल्या संवादाचा सार आहे. सुरुवातीला मी त्या भगिनी चे नाव विचारले, नाव सांगून त्या पुढे बोलत्या झाल्या आम्ही स्रीया प्रत्येक अमावस्येला व आखाजीला( अक्षय तृतीयेला ) दान मागत असतो ,मी त्या भगिनीची जात विचारली नाही व गरजही वाटली नाही माझ्या समोर फक्त एक स्री मानवी समूहाचे प्रतिनिधित्व करत होती .
भाऊ अमावस्या मागणी म्हणजे हा आमचा व्यवसाय नव्हे आमचे व्यवसाय दोरखंड तयार करणे, टोपले बनवणे, झाडू तयार करणे तसेच वाजंत्री वाजवणे अशा प्रकारचे आहेत .परंतु काही सामाजिक चालीरीती नुसार म्हणा की आमच्यावर लादल्या गेलेल्या परंपरेनुसार आम्ही याप्रकारे घरोघरी जाऊन अमावश्या मागत असतो. घरातील वडीलधारी, म्हातारीकोतारी माणसंदेखील म्हणतात की जा अमावस्या मागून आण.
अमावस्या वागण्याने सदरील घरावरील संकट ,ईडापिडा निघून जाते असे वडीलधारी मंडळी म्हणतात अशा त्या म्हणाल्या . आता वास्तविक पाहता अमावश्या मागत असताना त्यांना डाळ ,पीठ ,तांदूळ, मीठ ,तेल ,हिरवी किंवा लाल मिरची अशा प्रकारचे पदार्थ दिले जात असतात .किंवा जास्तीत जास्त घरात सणाच्या दिवशी काही गोड-धोड पदार्थ केला असेल तो दिला जात असतो त्याला आपण अन्नदान म्हणू शकतो .
माझ्या एकंदरीत अंदाजानुसार सदर महिलेचे कुटुंब इतिहासात गावकुसाबाहेर वास्तव्य करणारे ,व्यवसाय हीन ,संपर्कही ,शिक्षणहीन असले पाहिजे कारण काही कुटुंबाच्या , समाजाच्या डोक्यात अशा प्रकारच्या अंधश्रद्धा युक्त गोष्टी घालण्यात आल्या असाव्या त्यांच्या मानसिकतेवर आघात करण्यात आला असेल व एकदाका जर अज्ञानाचा फायदा घेऊन मानवी समूहाची परावलंबी विचार करण्याची मानसिकता तयार झाली की मग मानव आपल्या विचारांवर व आवडीवर काम न करता दुसऱ्यांच्या आवडीवर विचारांवर काम करत असतो .व त्याचा परिणाम वर्तमान स्थितीत सुद्धा काही प्रमाणात दिसून आल्या शिवाय राहत नाही.
19 साव्या व 20साव्या शतकात अनेक संतांनी व सामाजिक सुधारणावादी लोकांनी गावकुसाबाहेर राहणाऱ्या ,अज्ञानाच्या खाईत लोटल्या गेलेल्या लोक समूहासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केल्याचे निदर्शनास येत असते .मग ते सामाजिक,शैक्षणिक ,सांस्कृतिक ,किंवा आर्थिक आघाडीवरचे असो की अंधश्रद्धा मुक्तीची चळवळ असो, प्रयत्न हे होत आलेले आहेत व होत राहतील .या ठिकाणी माझ्या वाचनात आलेले एक उदाहरण मला पटकन आठवले व ते म्हणजे एकनाथ आव्हाड यांचं .
मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष असताना अनेक सुधारणावादी निर्णय एकनाथ आव्हाड यांनी घेतले होते. त्यांच्या चळवळीचा उद्देश समजावून सांगताना ते म्हणतात ते गावकीची कामे सोडावे ही गुलामीची प्रतीक आहेत .एकनाथ आव्हाड यांच्या वडिलांची इच्छा होती की एकनाथाने पोतराज व्हावे परंतु एकनाथांनी त्यांच्या स्वतःच्या वडिलांचे केस कापून पहिला प्रहार पोतराज प्रथेवर केला व घरातून सुरुवात करून जवळ जवळ 80 ते 90 कुटुंबातून ही प्रथा हद्दपार केली.
बोलता बोलता त्या म्हणाल्या की ग्रहणाच्या वेळी देखील आम्ही दान मागत असतो .व त्या वेळी म्हणतात की "दे दान सुटे गिरान " यावेळचे दान हे वेगळ्या स्वरूपाचे असते ते कपड्याचे स्वरूपात असते, ते जुने किंवा नवे कपडे देखील असू शकतात. मी म्हणालो ताई ग्रहण ही एक वैज्ञानिक घटना आहे पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या बदललेल्या स्थानावरून ग्रहण होत असते. त्यावर त्या ताईचं चटकन उत्तर आले की काही असो पण संकट जावे म्हणून ग्रहणाच्या वेळी देखील दान मिळत असते. समजा ग्रहणाच्या वेळी दान दिले व घेतले गेले नाही तर ग्रहण सुटणार नाही का? ते तर सुटणारच आहे.
त्या ताईची घरी जायची घाई असल्यामुळे त्या घाईघाईतच म्हणाल्या , आत्ताची शिकलेली पोरं त्यामुळे या गोष्टींना विरोध करतात, आणि आम्हालाही काही प्रमाणात सुचत होते, पण सुटले नाही, परंतु आम्ही सोडणार .येणाऱ्या पिढीने हे काम करू नये व आम्ही त्यांना हे करू देणार नाही. असा निर्धार त्या आवाजात जाणवला व झपाझप पावले उचलत आपल्या घराकडे त्या निघून गेल्या.
खरंच काही चालीरीती ,परंपरा ,रूढी ह्या अवैज्ञानिक असतात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असतात त्या समजतात, सुचतात पण सुटत नाही ,परंतु सोडणे हे मानवी आत्मसन्मानासाठी ,मानवी मूल्यांसाठी व मानवी कल्याणासाठी आवश्यक आहेत .
हेमकांत मोरे .
94 23 91 70 74






मोरे सर "सूचित होते,सुटले नाही" अप्रतिम मांडणी. चांगल्या विषयावर परखड मत मांडले. ॥ मच्छिंद्र वाघ कुंडाणे (वार ) ता.जि. धुळे.
ReplyDeleteThanks wagh Sirji .
ReplyDelete