एक प्रतिभावान कवी म्हणजे शंकर वैद्य
शंकर वैद्य : जन्म - १५/०६/१९२८ (ओतूर, पुणे)., मृत्यू - २३/०९/२०१४ (मुंबई) (८६ वर्षे).
कविता - छत्री
शंकर वैद्य यांनी पुणे, नागपूर, मुंबई इ. ठिकाणी मराठी अध्यापनाचे काम केले.
त्यांची पत्नी सरोजीनी वैद्य याही एक प्रतिभाशाली कवयित्री व चरीत्र लेखिका होत्या.
शंकर वैद्य यांना वयाच्या सातव्या वर्षापासून कवितेची गोडी होती. त्या आवडीचा पाठपुरावा करता करता ते पुढे कविता करू लागले.
बालपणात निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेल्या शंकर वैद्य यांच्या कवितांमध्ये निसर्ग परावर्तीत झालेला दिसून येतो.अत्यंत सोपे आणि सहज सुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते.
आकाशवाणीवरील त्यांच्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असे.
त्यांच्या अनेक कवितांना लता मंगेशकर यांनी आवाज दिला आहे.
शंकर वैद्य यांनी दीर्घकाळ म्हणजे जवळपास सात दशके कविता आणि अन्य लेखन केले.
"कालस्वर" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर २७ वर्षांनी "दर्शन" हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
दरम्यान अनेक मासिके, विशेषांक यातून त्यांच्या कविता प्रकाशित होत होत्या.
कवी कुसुमाग्रज यांच्या निवडक कविता असलेला "प्रवासी पक्षी" या काव्यसंग्रहाचे आणि कवी मनमोहन यांच्या कविता असलेल्या "आदित्य" या काव्यसंग्रहाचे संपादन शंकर वैद्य यांनी केले.
कालस्वर, दर्शन, सांजगुच्छ, मैफल, पक्षांच्या आठवणी... असे त्यांचे दर्जेदार कविता संग्रह प्रकाशित झाले.
त्यांच्या अनेक कविता रसिकमनावर कोरल्या गेल्या.
शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाळा...
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला...
पालखीचे भोई...
आज ह्रुदय मम...
रिमझिम...
वाळवंटातून भीषण...
अशा त्यांच्या अनेक गाजलेल्या कविता अजरामर आहेत.
शंकर वैद्य यांच्या प्रतिर्घ साहित्यातील कार्याची दखल घेऊन त्यांना वेळोवेळी साहित्याती अनेक पुरस्कार प्राप्त झाले -कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार,
महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार,
मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान पुरस्कार
असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले.
शंकर वैद्य यांनी कवितेचे विविध विषय आणि प्रकार हाताळले. तरीही साधे आणि सोपे शब्द असलेल्या रचना हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य राहिले. निसर्ग, समाज असे विषय आणि त्याच सोबत लयित लिहिलेल्या त्यांच्या अनेक कवितांची पुढे जाऊन सुंदर सुंदर गाणी झाली.
आज आपण त्यांची एका वेगळ्या मूडची आणि मुक्तछंदातील कविता पाहुया...
पाऊस पडतोय आणि एक अनोळखी पण सुंदर तरुणी त्याच्या छत्रीत येते... आणि पुढे त्याच्या मनातील भाव कल्पना कवीने सहज सुंदर सोप्या शब्दात आपल्या कवितेत चित्रीत केले आहेत.
ही कल्पनेची एक बाजू झाली.
एकाच कवितेत वाचकांना वेगवेगळे अर्थ सापडू शकतात. तसच याही कवितेचं आहे. या कवितेत संसाररुपी छंत्रीत ती आनोळखी सुंदर तरुणी येते. ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि मग संसारात होतं. एकमेकांच्या आधाराने जीवनातील अनेक संकटात, सुख-दुःखात ते एकमेकांना सोबत करीत पुढे जात असतात. आणि त्यामुळेच त्यांची संसाररुपी सुखाची छत्री हळूहळू मोठी होत जाते आणि दोघांनाही सामाऊन घेते.... अशा प्रकारचा आशयही परावर्तीत होताना दिसतो....
चला तर मग या कवितेचाच प्रत्यक्ष आनंद घेऊयात. तुम्हाला काही वेगळा अर्थ सापडतो का पहा...
छत्री
-----
हा असा पाऊस पडत असताना
तुमच्यासारख्या अनोळखी तरुणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंसं वाटलं...याचं बरं वाटलं..!!
ह्या अशा पावसाच्या वेळी कुणीतरी बरोबर हवंच...!
छत्री तशी छोटीच आहे, पण घेईल सामावून दोघांना...
समजुतीने चाललो तर...!
पुढं पाणी बरंच साचलेलं आहे, रस्ता चाचपीतच पावलं टाकायला हवीत.
शक्य असेल तर माझ्या हाताचा..
अं...खांद्याचा आधार घ्या,
म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर नीट चालत रहाल...न पडता.
शिवाय तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही मला दूरही ठेवू शकाल.
मी तुमच्याकडे न पाहताच चाललो आहे खरा...
पण मला कुठूनतरी केवड्याचा वास येतो आहे.
अं.. तुमचं नांव ‘केतकी’च आहे, असं मी धरून चाललो आहे.
तुमच्या बोटांतली अंगठी कळत्येय माझ्या खांद्याला;
लक्ष कसं सारखं तिथेच घोटाळतंय...
अरे..!
तुमच्या पोहचण्याचं ठिकाण तर मागेच गेलं.. तुम्ही बोलल्या कशा नाहीत?
अं...माझं काय..?!
अमुक एका ठिकाणी पोहचण्याचा उद्देश नव्हताच माझा.
पावसाचा जोर एकदम वाढलाय म्हणून तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटत्येय.
पण घाबरू नका.. पुढचा रस्ता चांगला आहे!
एक पाहिलंत का?
तुम्ही अगदी नीट चालल्या आहात...माझ्याबरोबर..!
त्यामुळे...छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटत्येय...नाही का..?!!
- शंकर वैद्य
◆◆◆◆◆
संदर्भ - इंटरनेट
विनंती - या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो - विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना - या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■
विजो - विजय जोशी यांच्या कविता, उपक्रम आणि इतर कविता साहित्य वाचण्यासाठी त्याच्या फेसबूक पेजला पुढील लिंकवरून भेट द्या.
https://www.facebook.com/vijayjoshi20/
उपक्रम - स्मृतिगंध (क्र.२२)
(प्रत्येक गुरुवार आणि रविवार)
कविता मनामनातल्या...
(विजो) विजय जोशी - डोंबिवली
९८९२७५२२४२
१८/१०/२०२०





0 Comments: