कोविड-१९ महामारीत पोलिस ठाण्यातून जेष्ठ नागरिकांची विचारपूस..
डोंबिवली ( शंकर जाधव ) ऑनलॉकनंतर जरी काही प्रमाणात व्यवहार सुरू झाले असले तरी लॉकडाऊन काळात कोविड-१९ च्या महामारीत सर्वसामान्य नागरीकांमध्ये सर्वदूर भितीचे वातावरण होते. कोविड-१९ दरम्यान जास्त प्रमाणात जेष्ठ नागरिकांना संक्रमण होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर होता. त्याही परिस्थितीत प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांच्या तब्बेतीची विचारपूस केली जात होती. जेष्ठांनी कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन पोलीस अधिकारी देत होते अशी माहिती डोंबिवली जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण मालुसरे यांनी दिली.
कोरोना महामारीत जेष्ठ नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. डोंबिवली जेष्ठ पती-पत्नी एकट्याच राहणाऱ्या असल्याने त्यांना या परिस्थितीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. काहींचे बाहेर जाणे बंद पडल्याने त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. चालणे बंद झाल्याने इतर आजारांना आमंत्रण मिळू लागले. परंतु दरम्यान ठाणे पोलीस ठाण्यातील जेष्ठ नागरिक कक्षामधून आपुलकीने तब्येतीची विचारणा करण्यात आली. पोलिसांनी कोरोना काळात काय करावे याचे उत्तम मार्गदर्शन केले. नियमित झेपेल त्या रितीने व्यायाम करा, योगाभ्यास करा, आपापली औषधे वेळेवर घ्या. त्याचबरोबर आवडीनुसार वाचन करा अशा सूचनाही केल्या गेल्या. दरम्यान रामनगर पोलीस ठाण्यातूनही जेष्ठ नागरिकांना फोन करून त्यांनी काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात आल्याचेही मालुसरे यांनी सांगितले. ठाणे पोलीस ठाण्यामधून दर आठवड्यातून फोन येत होता तर डोंबिवली पोलीस ठाण्यातून फोनवरून जागरूक केले जात होते. जेष्ठ नागरिकांची यादी पोलीस ठाण्यात असल्याने प्रत्येकाला फोन करण्यात आला. डोंबिवलीत सुमारे २०-२२ जेष्ठ नागरीक संघ असून चार हजार सभासद सदस्यांची नोंदणी झाली आहे. काही संघात ४००-५०० ची संख्या असून काही २००-२५० सदस्य आहेत. औद्योगिक विभागात आणि ठाकुर्ली विभागात नवीन जेष्ठ नागरिक संघ झाले असून त्यांची संख्या सध्या कमी आहे. जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून अनेक सदस्यांच्या समस्या सोडविल्या जातात. काही समस्या असल्याने घरात आनंदी वातावरण नसल्याने त्याचा त्रास होण्याची दाट शक्यता असते अशा वेळी अनपेक्षितपणे फोनवरून काळजी घेतली जाते. डोंबिवलीत रवींद्र खानोलकर यांच्या माधायामातून परिवर्तन विरंगुळा केंद्रा तर्फे जेष्ठ नागरिकांना एक व्यासपीठ कोरोना काळात उपलब्ध झाले आहे. पोस्ट कार्यालय, बँका तसेच सरकारी कार्यालयात जेष्ठांना विशेष सवलती मिळाल्या असून जेष्ठ नागरिक त्याचा फायदा घेत आहेत.




0 Comments: