लालपरी वाचवा

लालपरी वाचवा

 लालपरी वाचवा 




महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजे आपली लालपरी एस.टी.अगदी १९५०पासून आजपर्यंत ही एस.टी अनेक संकटे पार करत 

राज्यातील खेड्यापाढ्यात,वाडी वस्तीवर, डोंगरदर्यात, अविरत सेवा देत आहे.यात्रा असो,मतदान असो, आपत्ती असो,विद्यार्थी वाहतूक असो,सहल असो बिचारी एस.टी आहेच.अहोरात्र प्रवाशांच्या सेवेसाठी हे  ब्रीद वाक्य सर्वार्थाने एस.टी पुर्ण करीत आहे. अगदी आताही मुंबईच्या मदतीला ती १००० बसेससह २४सप्टेंबर पासून धावून आलीच.याच  एस.टी मुळे बेस्टची प्रवाशी संख्या दररोजची  १७लाखांवरून २२लाखांवर गेली. या एस.टी.च्या सेवेसाठी चालक, वाहक, तंत्रज्ञ, कार्यालयीन कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी सर्वजण २४ तास मेहनत करीत असतात.पण नेहमीच एस.टी कर्मचाऱ्यांना  चार चार महिने पगार नाहीत,त्यांच्या खात्यावर ३०रूपये ४०रूपये पगार, एस.टी.महामंडळ दिवाळखोरीत, एस टी कर्मचाऱ्यांची उपासमार,अशा बातम्या आपण वाचतो,टी.व्ही.वर पाहतो त्यावेळी मात्र  मन सुन्न होतं. आज काही सरकारी कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कामं करूनही ७०ते ८० हजार पगार वरून बोनस येत आहे आणि दुसरीकडे कामाचे कोणतेंही  तास नसणारा,  खाच खळगे सहन करीत ऊन वारा पाऊस  यात काम करणारा, परिवारापासून हप्ते हप्ते दूर राहणारा,मुक्कामी मिळेल ते अन्न खाणारा,घामाघूम अंगाने काम करणारा एस.टी.कर्मचारी मात्र मुळातच कमी असणाऱ्या आपल्या पगाराकडे  आशाळभूत   नजरेने पाहत असतो.आपण सर्वानी याचा विचार केला पाहिजे.तिथली अस्वच्छता आपल्याला दिसते पण त्यांच्या पोटातील आग दिसत नाही.सर्व समाजाने व शासनाने यावर गंभीरपणे  विचार करणे आवश्यक आहे.या आपल्या लालपरीला चांगले दिवस कसे येतील व एस.टी कर्मचारी सुखाने आनंदाने कसा राहील याचा विचार केला पाहिजे.


                         -प्रदीप कासुर्डे 

                    घणसोली नवी मुंबई

1 comment

  1. धन्यवाद संपादक साहेब

    ReplyDelete