द्यायची का शेती, डुकरांच्या हाती ?
-ज्ञानेश वाकुडकर
सैतानाच्या हाती | रान गेले भाऊ |
झोपी नको जाऊ | जाग आता ||१||
खूप झाल्या चुका | फार झाल्या झोपा |
काळ तसा सोपा | नाही आता ||२||
कसे कसे साप | संसदेच्या आत |
रोज नवी कात | सापडते ||३||
संसद भाडोत्री | कायद्याचे काय ?
बाप आणि माय | मेले त्याचे ||४||
मेली न्यायालये | ऐसी झाली गोची |
पाखरांच्या चोची | लॉक केल्या ||५||
जुनी मोठी झाडं | एक एक फांदी |
चष्मा आणि गांधी | विकियेला ||६||
ऐसे अराजक | आरपार गेले |
सैतानाचे चेले | गल्लोगल्ली ||७||
कार्पोरेट जोडे | बायकांच्या साड्या |
धुण्यासाठी भाड्या | ठेवलेला ||८||
बळीराजासाठी | पुन्हा नव्या थापा |
हवा तसा कापा | बिचाऱ्याला ||९||
सैतानाच्या शाखा | जुने - नवे बिल्ले |
ढापायाला किल्ले | मैदानात ||१०||
घास तुझे विळे | नांगराचे फाळ |
आला ऐसा काळ | जीवघेणा ||११||
द्यायची का शेती ? डुकरांच्या हाती ?
झाली तीच माती | फार झाली ||१२||
-
ज्ञानेश वाकुडकर
नागपूर १०|०१|२०२१




0 Comments: