बच्चे लोग, हा पहा भारताचा नकाशा
भारताचा नकाशा पहिला की माझे डोळे पाणावतात. नकाशा धूसर होतो आणि माझ्या प्रिय मोहन सरांचा चेहरा मला दिसू लागतो.
एवढ्या निर्मळ मनाचा माणूस मी माझ्या सम्पूर्ण आयुष्यात पहिला नाही.
ते थोडेसे चौकटीत न बसणारे बहुरंगी व्यक्तिमत्त्व होते. पण त्यांचे काळीज पूर्ण सोन्याचे बनवलेले होते.
मराठा सावंत पटेल जातीचा कोणताही खोटा अभिमान त्या माणसामध्ये नव्हता.
मध्यम उंचीचे, गहू रंगाचे, सडसडीत, पुढचे केस वळणदार असणारे मोहन सावंत सर एका हातात बॅग घेऊन मान वाकडी करून चालायचे. मी समोर दिसलो की मस्त हसायचे.
ते फक्त नावाचे शिक्षक होते. त्यांनी कधी आम्हाला शिकवले नाही. वर्गात गावभरच्या आणि मुंबईच्या गप्पा सांगत बसायचे. आम्ही पोरे तरी कोठे अभ्यास करायला आलो होतो! आम्ही त्यांच्या गप्पा आवडीने ऐकत बसायचो. आम्हाला त्यांची भीती नव्हती. मी त्यांची कधीकधी टर उडवायचो. मग ते म्हणायचे- 'मेल्या तुका काय कामधंदे नाय.'
कधी कधी वर्गात पेपर वाचत बसायचे. एखादा जोक असला तर मला बोलवून वाचायला सांगायचे. मग आम्ही दोघे मिळून हसायचो.
त्यांनी आम्हाला काही शिकवले नाही पण आमच्यावर खूप मनापासून प्रेम केले.
आमच्या वर्गातल्या शिवाजी सावंतला ते राजू म्हणायचे. तसे बोलणे मला खूप आवडायचे. त्यांनी मला पण राजू म्हणावे असे मला मनातून वाटायचे.
मी आठवीत असल्यापासून मुंबईच्या मॅनेजमेंट कमिटीची पत्रे शाळेला यायची. ' सतीश पवार हा मुलगा बोर्डात येणारा आहे तरी त्याच्यावर लक्ष ठेवा' . सर मला ती पत्रे वाचवून दाखवायचे.
दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत सर आम्हा हुशार मुलांना घरी बोलवायचे. खालच्या वर्गातील मुलांचे पेपर आमच्याकडून तपासून घ्यायचे.
मी मुंबईत KEM हॉस्पिटलमध्ये असताना सर माझ्याकडे यायचे. आम्ही शेट्टीच्या कँटीनमध्ये जेवायचो. सर मग माझ्या रूमवर आराम करायचे.
एकदा आम्ही शिवाजी पार्क जवळच्या एका बारमध्ये गेलो. एक एक बिअर मारली. त्यावेळी माझे करिअर प्लॅन नेहमी बदलत असत. सरांना मी म्हटले, ' सर मी पोलीस ऑफिसर होणार'.
सर म्हटले,' पोलीस खात्यात उलट्या काळजाचा माणूस लागतो. तू सरळमार्गी माणूस आहेस. तू डॉक्टरच हो.'
त्याच वर्षी सर हार्ट अटॅकने वारले. मी बाईंना भेटायला गेलो होतो.
अशी कित्येक माणसे ना माझ्या नात्या गोत्याची, ना जाती पातीची. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले.
कुणी मला अमुक जातीचा सरसकट द्वेष करायला सांगतो, ते मला अजिबात आवडत नाही.
माणूस हिणकस असतो, कुसका असतो कारण त्याच्या आईवडिलांनी आणि शिक्षकांनी त्याला तसे शिकवले असते. तो कोणत्या जातीचा असतो म्हणून तो तसा नसतो.
तुमच्या आणि माझ्या खापर पणजोबाची 200 किंवा 400 वर्षापूर्वी लढाई झाली म्हणून तो इतिहास आता उगाळून आपण लढायचे आहे का?
आम्ही बारावीत मराठा, ब्राह्मण , मुसलमान आणि मी चर्मकार असे दोस्त गळ्यात गळे घालून फिरलो. आम्ही आतापण तसे आहोत.
मी थोडा हिंदू आहे, थोडा मुसलमान, थोडा बुद्ध आणि थोडा किरीस्ताव आहे. त्यामुळे मला कोणच जवळ करत नाही.
जातीपातीचे द्वेषाचे राजकारण जोरात चालू आहे. एकांगी प्रचार केला जातो.
बाबासाहेबाना महाराजा गायकवाडनी मदत केली. महाडच्या सत्याग्रहामध्ये ब्राह्मण लोक सहभागी झाले होते.
एका बाजूला दलितांवर अन्याय होत आहे, भेदभाव होत आहे पण दुसऱ्या बाजूला दलितांना आरक्षण पण दिलेले आहे. असे आरक्षण आणि फी माफी कुठल्या देशात आहे?.
दलितांचे आरक्षण दलितांमधील पैसेवाले खाऊन टाकतात. गरीब दलितांची मुले तशीच गरीब आणि बेकार राहतात.
माझ्यावर पण अन्याय झाला. मला जातीमुळे विहिरीवरून आणि देवळातून हाकलले आहे. पण घरात उंदीर झाले तर उंदीर मारायला पाहिजे. घर जाळले जात नाही.
आमच्या चर्मकार समाजात एक दोन नग आहेत. ते आम्ही हिंदू धर्माला चिकटून आहे म्हणून आम्हाला तुच्छ मानतात. हिंदू देवतांची टिंगल करतात. टिंगल करा, राग नाही. टिंगल करणे आणि ती सहन करणे, हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण आहे. पण ते कधी समाजातील गरीब मुलांना पाच पैसे काढून देणार नाहीत.
मी CT स्कॅन टाकत होतो तेव्हा मला मदत म्हणून माझ्या चार मित्रांनी प्रत्येकी अडीच लाख असे दहा लाख रुपये जमा केले होते. त्यापैकी एक मित्र ब्राह्मण, एक मराठा आणि दोन मित्र OBC होते. ते माझे CT स्कॅन माझ्या जवळच्या चर्मकार आणि बौद्ध बंधूनी बुडवले. कसली जात घेऊन बसला राव!
मी चर्मकार समाजाच्या सभेत जात नाही. तुला आरक्षण पाहिजे पण समाज नको अशी माझ्यावर टीका होते. मी माझ्या समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मदत करतो. मी पैसे दिले म्हणून मराठा समाजातील दोन गरीब मुलांची लग्ने झोकात झाली. माझ्या काही गरीब इतर जातीतील मित्रांना मी मदत करतो. तेही मला मदत करतात. हे मी मुद्दाम लिहीत आहे कारण याची गरज आहे.
समाज एकसंध व्हावा असे मला वाटत असते.
आमच्या मोहन सरांची शाळा पुन्हा कधीच भरणार नाही.
मेल्या तुका काय कामधंदे नाय, असे म्हणणारे सर मला परत भेटणार नाहीत.
डॉ सतीश सदाशिव पवार
कणकवली
08 जान 2021
श्री मोहन शिवराम सावंत.
जन्मदिवस 01march 1944
पुण्यतिथी 30 nov 2000.





0 Comments: