डोंबिवलीतील रिक्षा चालकाला लुटले
डोंबिवली ( शंकर जाधव ) ₹ डोंबिवली पश्चिमेकडील संजय तायडे हे रिक्षा चालक सोमवारी दुपारी २ वाजता महात्मा फुले रिक्षा स्टन्डवर प्रवाशाची प्रतीक्षा करत असताना दोन अनोळखी व्यक्तीं आपल्याला शहाड येथील बिर्ला मंदिरात दर्शनासाठी जायचे असल्याचे सांगत त्यांच्या रिक्षात बसले. तायडे या दोघांना घेऊन बिर्ला मंदिरापर्यत गेले. ते दोघे मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर तायडे त्यांची वाट पाहत रिक्षात थांबले होते. काही वेळाने परत आलेल्या त्या दोघांनी तायडे यांना मंदिरातील प्रसाद म्हणून पेढे खायला दिले. मात्र या पेढ्यात त्यांनी गुंगीचे औषध टाकले होते. तरीही तायडे यांच्यावर या पेढ्याचा काहीही असर झाला नसल्याने परत येताना त्यांनी कल्याण मार्गे जायचे असल्याचे सांगत त्याना प्रेम ऑटो येथे आणले. याठिकाणी या दोघांनी तायडे यांना आईस्क्रीम खाण्याचा आग्रह केला. ते आईस्क्रीम खाण्यास तयार होताच हातचलाखीने त्यांनी त्यांच्या आईस्क्रीममध्ये गुंगीचे औषध टाकले. यामुळे आईस्क्रीम खाताच तायडे बेशुद्ध झाले. ते बेशुद्ध होताच दोन्ही आरोपींनी त्यांच्या गळ्यातील २० ग्राम वजनाची सोन्याची चैन तसेच त्यांच्या शर्टाच्या खिशात असलेले २००० रुपयाची रोकड घेऊन त्यांना रस्त्यातच रिक्षात सोडून पोबारा केला. शुद्धीवर आल्यानंतर तायडे यांना आपली फसवणूक आणि लुट झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या आरोपीचा कसून शोध घेत आहेत.




0 Comments: