ब्राह्मणसभेच्या वतीने सामुदायिक अथर्वशीर्ष पठण
कोरोनामुक्तीसाठी गणरायाला प्रार्थना
नवीन पनवेल दि. 30:
(श्रीनिवास काजरेकर)
गणेशोत्सवाच्या निमित्ताने ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला. वैशाली सरदेशपांडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम गुगल अॅपवर ऑनलाईन स्वरूपात केला गेला. पनवेल परिसरातील गणेशभक्तानी याचा लाभ घेतला.
संस्थेच्या सभासद माधुरी सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर सदानंद चितळे यांनी श्रीगणेश उपासनेचे महत्व कथन केले. ते म्हणाले, मंत्रशास्त्र व शिवस्वरोदयशास्त्राच्या दृष्टिकोनातून गणेशउपासनेला खूप महत्व आहे. बीजमंत्र हे खूप प्रभावी आहेत. गणेशैचे 'गं' हे बीज असून त्यातील अनुस्वार हा अणुस्वरूप असल्याने त्यात सामर्थ्य आहे. ते समूहदर्शक बीज असून त्या उपासनेमुळे नेतृत्वगुण वाढतात. तसेच ते सर्वांना एकत्र जोडणारे बीज आहे. गणपती हा भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती करणारी देवता असल्याने त्याची उपासना प्रभावी असल्याचे चितळे यानी सांगितले.
त्यानंतर शांतिमंत्राने अथर्वशीर्ष पठणाला प्रारंभ झाला. विश्वावर आलेले कोरोनाचे संकट नाहिसे होवून उत्तम आरोग्यप्राप्ती व्हावी हा संकल्प करून आवर्तने करण्यात आली. मंजुषा भावे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.






0 Comments: