तो आणि ती (भाग 6 )

तो आणि ती (भाग 6 )

   तो आणि ती (भाग 6 )

खरं सांगायचं तर तिचा मेसेज आल्यापासून मी खूप उत्साही झालो होतो मात्र आमची भेट अजूनही ठरली नव्हती. तिला भेटण्यापूर्वी मला बराच अभ्यास करणे गरजेचे होते. त्याच्या लिखाणातून आणि उपलब्ध साधनांवर विसंबून मी अनेक तर्क- वितर्क लावले होते. असे असले तरीही मी मांडलेल्या सर्व गोष्टी अगदी बरोबर नसल्या तरी त्या पूर्ण चुकीच्या असू शकत नाहीत याची मला खात्री होती. तिच्याकडची पुरेशी माहिती नसली तरी त्याच्याकडील माहितीच्या जोरावर मी ठामपणे सांगू शकतो त्याचे तिच्यावर खूप प्रेम होते. वर्षभरापूर्वी निघून गेलेला तो आपल्या बॅगेत तिची ओढणी तशीच सोडून गेला होता हि गोष्ट मला त्यांचे अगदी जुने फोटो पाहून खूप उशिराने लक्षात आली. त्या ओढणीमागे काय कहाणी असावी हे नक्की जरी सांगता येत नसले तरीही ती जवळ नसतांना ही ओढणी वेळोवेळी त्यांच्यासमवेत पाहण्यास मिळाली. दोघांना प्रवासाची खूप आवड होती हे मात्र नक्की त्याला नवीन मोबाईल विकत घ्यायचा होता मात्र तिच्या सांगण्यावरून त्याने तो घ्यायचे टाळले. एका गोष्टीचे आश्चर्य असे की आमच्या गेल्या २० वर्षाच्या मैत्रीत आम्हांला एकमेकांच्या अनेक बाबी माहीत होत्या अगदी गुपितही. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला प्रत्यक्ष भिडणारा तो अगदी वेगळाच प्रवाहाविरुद्ध पोहणे त्याला जास्तीच आवडे. इतरांसाठी मोठी उपलब्धी असलेली गोष्ट त्याच्यासाठी खूप थिल्लर असायची. अत्यंत आक्रमक स्वभाव असूनही त्यांची कोणाशीही हाणामारी झालेली नाही ही त्याच्या वर्तवणुकीची अनोखी बाब होती. त्याच्या वहीत अनेक गोष्टींचा उलगडा त्याने पद्धतशीर मांडला होता. बऱ्याच अवकाशाने शेवटी माझी तिच्याशी भेट झाली आमचं बोलणं सुरु झाले त्यानंतर मला एक गोष्ट जाणवली कि ती खूप शांत आहे अगदी फोटोत दिसते तशीच. मला कितीही राग आला तरी ती समोर आल्यावर मला तिच्यावर रागावता येत नाही असे त्याने लिहून ठेवले होते. तिच एकंदर चेहरा पाहिल्यास प्रत्येकच व्यक्ती शांत व्हावा अगदी तसाच रुबाब त्या चेहऱ्याचा मला जाणवलं. माझी पद्धतशीर ओळख मला तिने करून दिली माझ्याबद्दल प्रत्येक गोष्ट तिला माहित होती. माहित नाही कशी पण तिला माझ्याशी निगडित प्रत्येक गोष्टीची हितंभूत माहिती होती. शक्य तितकी माहिती तिच्याकडून काढणे एवढेच मला दिसत होते. आमची पहिली भेट माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरली माझ्या तिला समजावून घेण्याच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात त्याला शोधण्याचा शक्य तो सर्व प्रयत्न प्रत्येकाने केला होता अगदी तन्मयतेने मात्र तो कोणाच्याही दृष्टीस आला नव्हता. तिला भेटल्यावर माझा तिच्यावर असलेला राग बराच वाढला तिच्या नामस्मरणाने बेधुंद झालेला तो आज सोबत नसतांनाही मला त्याच्या अस्तित्वाची चाहूल अनेक माध्यमांतून दाखवून देत होता मात्र याउलट पहिल्या भेटीत तिने त्यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही मला खरें तर सर्व प्रश्नांची उत्तरे तिला पाहताच क्षणी विचारता आली असती मात्र त्याच्या शब्दांनी मला रोखले होते. माझ्यानंतर तिची संपूर्ण जबाबदारी तुझी आहे या विश्वासावर तो मला सरणावरच्या मार्गावर एकटं सोडून गेला होता. माझी एक चूक मला जड जाणार होती मी शांत झालो होतो त्याच्या शब्दांमुळे आणि, "तिच्या बोलण्याचे ऐसे काय सांगावे तंतर, मन मोहुनिया जाती काय घालती मंतर" आमच्यातील संवादाने मी थोडाफार सुखावलो होतो इतके मात्र नक्की मी चेहऱ्यावर खोटं हास्य दाखवत तिचा निरोप घेतला. जग हे सुंदर आहे आपण सुंदर होऊया या उक्तीला न्याय देण्याचा हेतूने मी माझ्या असंख्य भावनांना शांत केले आणि तिला समजावून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. अनेक दिवस यापुढे आमची भेट झाली नाही  मी सतत त्याच्या घरी जावू लागलो त्यानें माझ्यापासून लपवलेल्या प्रत्येक गोष्टी बारकाईने शोधू लागलो समजू लागलो. स्वतःच्या कामाच्या बाबतीत अत्यंत शिस्तप्रिय असलेला तो आपल्या प्रत्येक वस्तू अगदी सांभाळून ठेवत असे त्याच्या घरांत त्यांच्या वस्तूंचा रिघ लागला होता. त्यांच्या एकत्र प्रवासातील प्रत्येक आठवण माझी रात्रीची झोप उडवू लागले होते. त्यांच्या प्रेमाचा हा अनोखा शोध मला अगदी वेगळ्या जगात घेऊन आला होता. माझा अभ्यास तर चालूच होता मात्र मन नेमकं लागत नव्हतं का कोणास ठाऊक पुढे पुढे झालेल्या प्रसंगांना उगाच उकरत बसणे माझ्या स्वभावाला पटतं नव्हते माझ्या मनाची समजूत घालून मी कसेबसे हे काम करत जात होतो.


तो आणि ती (भाग 6 )

संकलन- अविनाश पाटील

0 Comments: