कविता - बेवारस
सगळीच गावं
नसतात नदीच्या काठाला
नसतात डोंगराच्या पायथ्याशी वा माथ्यावर
नसतात चमचमणाऱ्या वाळवंटाशेजारी
उजाडतात ही गावं थेट सपाटीवरच्या
अंधारपात्रात….
सगळ्याच गावाचा रस्ता
नसतो घाटातून पूले ओलांडून
वा वळणावळणाचा
असतात ही गावे जाणारी सरळ सरळ मार्गाने.....
लाभत नसते नेमकी
दत्तक घेणारी एखादी संस्था
या सरळगावालाच....
नसतो या गावाच्या दमट अस्मानी हवामानाचा भूगोल अभ्यासाला
जिवगेल्या जिंदगीचा इतिहास नसतो
कोणत्याच सनावळीत वा बखरीत
नकाशात वा गूगलमॅप वर नसतात इथल्या पायवाटेच्या रेघोट्या
नसते दगडी ठेच्याची ठसकेबाज चव
कोणत्याच खाद्यसंस्कृतीच्या रेसिपी पुस्तकात......
गुलाबी दूनियेपासून
लाखो मैल दूर फेकलेले असते हे गाव
काटेरी बाभळीच्या घनदाट वास्तवात
बेवारस जगत राहते पिढ्यापिढ्यांना घेऊन
कुठे असतो वार्ताहर
द्यायला बातमी
आपण यांना पाहिलत का ?
या डोळस असणाऱ्या पाणीदार सदरात.....
अमोल विनायकराव देशमुख
महेंद्र नगर परभणी
संपर्क - 7620949985





अतिशय सुंदर कविता. जनसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारी
ReplyDeleteधन्यवाद
Delete