कविता : सगळे गाती सूर लावुनी
सगळे गाती सूर लावुनी, जीव लावुनी गातो कोण?
कवितेच्या गर्भात शिरुनी भावार्थाला भिडतो कोण?
गीतामधली भाववादळे सबल स्वरांनी झेली कोण ?
अहंकार फेकून सुरांना ममतेने कुरवाळी कोण?
नाभीतून ओंकार फुटावा तैसे सहजच गातो कोण ?
गात गाता, अक्षर अक्षर सावधतेने जपतो कोण?
शब्दांच्या पलीकडले स्पंदन सुरातुनी आळवितो कोण?
गीतामधली विरामचिह्ने, तीही बोलकी करतो कोण?
निजस्वराचा पहिला श्रोता अपुला आपण होतो कोण ?
विश्वामधल्या रसिककुळाशी सुरेल हितगुज करतो कोण?
कोण प्रश्न हा उठतो कसा. 'लता' म्हणा अन् गप्पा बसा.
कोण म्हणजे दुसरे कोण?
लता मंगेशकर आणखी कोण? -
यशवंत देव
0 Comments: