तो आणि ती
त्यांचा सवांद थांबण्यामागची नेमकी कारणं मला कुठेच सापडली नाहीत आणि आपण हरलो आहोत हि भावना मला कुठेतरी सतत खात होती. जिंकण्यासाठी मी प्रयत्न करूनही करू शकत नव्हतो त्याला दिलेले वचन आणि तिची घ्यायची काळजी यात मी पुरेपूर फसलो होतो. हतबल झालेला माझा दुसरा सहकारी बऱ्याच पूर्वी मला पुढील कामात एकटे सोडून गेला होता. घर, मित्रपरिवार, कॉलेज ते एकत्र गेलेल्या असलेल्या प्रत्येक प्रसंगाला मी नकळत अनुभवले होते जाणून घेतले होते मात्र मला कोठूनच माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. गेल्या अनेक दिवसांच्या या प्रवासात मी पुरा गुंतलो होतो आणि एक प्रकारची निराशा मला पूर्ण गिळंकृत करत होती. आता हातपाय मारण्यात काही अर्थ नाही हे ओळखून मी कारणं शोधत बसणे सोडून दिले. माझ्याकडून अत्यंत सहजपणे होणारी गोष्ट न करता आल्याचे शल्य मला टोचत होते त्याच्या दोघांच्या आठवणी, वस्तू, फोटो सर्व माझ्या नजरेसमोर फिरत होत्या अगदी सातत्यानं. त्यांच्या आठवणींचं गाठोडं बांधून मी आजकल आभाळाला स्वतःचे दुःख सांगत फिरतोय. हरण्यापेक्षा प्रयत्न न करता येणं ही बाब खूप भयंकर आहे आणि माझ्या बाबतीत हेच घडत होते. शेवटी मी निर्णय घेतला त्याला न शोधण्याचा आणि त्यांच्या प्रेमाची ही कहाणी अर्धवट सोडण्याचा. त्याच्या आयुष्यातील ती मला खूप सुंदर, शांत आणि त्याला समजावून घेणारी, त्याला शांत करणारी दिसली मात्र तिच्या आयुष्यातील तो मला कधी स्पष्टपणे मांडताच आला नाही त्यांच्या प्रेमाची कहाणी एकतर्फी मांडणे माझ्या स्वभावाला पटतच नव्हतं.
तो आणि ती (भाग ८)
लेखन- अविनाश पाटील




0 Comments: