डोंबिवलीत षटचक्र ध्यान साधना शिबीर (Online) डोंबिवली ( शंकर जाधव ) योग विद्या धाम डोंबिवली या संस्थेने सोमवार २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२० या कालावधीत सकाळी साडे सहा ते आठ या वेळेत षटचक्र ध्यान साधना शिबीर आयोजित केले आहे. योग कार्यासाठी पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित ऋषिधर्मज्योती डॉ. विश्वासराव मंडलिक गुरूजींनी ह्या कार्यक्रमाची निर्मिती केली असून दररोज अर्धा तास डॉ. मंडलिक यांचे प्रवचन व एक तास ध्यान साधना असा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्राचीन योगशास्त्र व आधुनिक वैद्यकशास्त्र, वैज्ञानिक दृष्टिकोनातून षट्चक्र ध्यान, ध्यान साधना म्हणजे काय, षटचक्र व पाठीचा कणा, आत्मा व परमात्मा, कुंडलिनी व ध्यान, कर्मयोग आणि ध्यान, मौन व ध्यान इ. विविध विषयांवर डॉ. मंडलिक यांचे प्रवचन व प्रात्यक्षिक ध्यान व स्वाध्याय होणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी गुरुजी साधकांच्या प्रश्नांचे शंका निरसन करतील. कुंडलिनी जागृती म्हणजे मेंदूतील सुप्त असलेल्या पेशी कार्यरत होणे. मानवी शरीरात कुंडलिनी शक्ती सुप्तावस्थेत असते व या असीमित शक्तीच्या जागृतीची अनुभूती व नित्य साधना आपल्याला अध्यात्मिक प्रगती बरोबरच शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा लाभ मिळवून देते. मूलाधार चक्रात सुप्तावस्थेत असलेल्या कुंडलिनी शक्तीला जागृती करून तिला सुषुम्ना मार्गाने एक एक चक्र जागृत करीत अखेर सहस्त्रार चक्रापर्यंत आणणे हाच कुंडलिनी योगाचा विकासाचा मार्ग आहे. ही साधना सर्वांना करता येणे शक्य आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पाठीच्या मणक्यांचे विकार या सारख्या अनेक दुर्धर आजारांपासून मुक्तता,नैराश्य, निद्रानाश इत्यादि मानसिक आजारातून सुटका,मानसिक आरोग्य सुधारते,मेंदूची कार्यक्षमता वाढून मनाची एकाग्रता वाढते,मनःशांती मिळते, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो हे षट्चक्रध्यानाचे फायदे आहेत.या शिबिरात सध्याच्या करोनाच्या महासंकटात आपले सैरभैर झालेले मन ध्यानात लावून परमानंद मिळावा व जनतेचे मानसिक व शारीरिक आरोग्य निरोगी रहावे या उद्देशाने षटचक्र ध्यान साधना शिबीर योग विद्या धाम डोंबिवली तर्फे आयोजित करण्यात आले आहे. डॉ. मंडलिक गुरुजी व योग विद्या गुरुकुल नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली योग विद्या धाम डोंबिवली १९८३ पासून योग प्रचार व प्रसाराचे कार्य करत असून संस्थेचे वर्ग भारत सरकारच्या आयुष विभागाने प्रमाणित केले आहेत. योग विद्या गुरुकुल या संस्थेला भारत सरकारने “लिडिंग योगा इन्स्टिट्यूट” हा योगा सर्टिफिकेशन बोर्डाच्या बरोबरीचा दर्जा दिला आहे. या संस्थेच्या सर्व वर्गांना आयुष विभागाची मान्यता आहे. लॉकडाऊनपासून संस्थेने प्राणायाम, योग संजीवन, योग प्रवेश, योग परिचय इ. अनेक ऑनलाईन वर्ग आयोजित केले व त्यास देश व परदेशातील हजारो साधकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.अधिक माहितीसाठी संपर्क छाया थत्ते 9819237108, सुहास बडंबे +919221577156. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फॉर्मची लिंक https://forms.gle/
|




0 Comments: