कथा : कुपोषण आणि असमानता  (हेमकांत मोरे)

कथा : कुपोषण आणि असमानता (हेमकांत मोरे)

 कुपोषण आणि असमानता.     




भारतात अन्नाची कमतरता , उणीव नव्हती व नाही ,परंतु सामाजिक असमानता मुळे मानवाला पाहिजे तसे अन्न उपलब्ध होत नव्हते. पूर्वापार चालत आलेल्या सामाजिक अनिष्ट प्रथांमुळे एकंदरीतच बहुजन समाजाला त्यांच्या सर्वांगीण विकासापासून लांब ठेवले गेले. मानवा - मानवाला जवळ येऊ दिले गेले नसल्याने देशाच्या सर्वांगीण विकासावर याचा परिणाम दिसून येत असतो.


 महाराष्ट्रात नंदुरबार ,धुळे ,ठाणे , पालघर या जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येत असते . या जिल्ह्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे व कुपोषणाचे सर्वात जास्त प्रमाण याच समाजात आहे .अनुसूचित जमातीच्या खालोखाल कुपोषणाचे प्रमाण अनुसूचित जातीमध्ये आहे . वरील दोन्ही समुदाय असमानतेचे बळी असल्याचे आपण इतिहासात पाहत आहोत. तसेच भटके, स्थलांतरित होणारे कुटुंब यांच्यात कुपोषणाचे प्रमाण देखील आढळून येत असते .



ज्या लोकांपर्यंत जगातील सुखसोयी,नवविचार , आधुनिक साधन सामुग्री , आधुनिक तंत्रज्ञान , लवकर पोहोचले नाही त्याच लोकांमध्ये या कुपोषणाने  विळखा घातलेला आहे . सामाजिक असमानतेमुळे अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, भटके स्थलांतरित होणारे कुटुंब आधुनिक जगापासून लांब राहिल्याने त्यांच्यात मग अंधश्रद्धा सुद्धा वाढीस लागलेली दिसून येत असते . अंधश्रद्धा मुळे माणूस सारासार विचार करू शकत नाही व त्यांच्या कार्यशैलीवर देखील परिणाम जाणवत असतो.


 कुपोषणाचा कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याने मुले बाल श्रमिक म्हणून उदयाला येतात आणि मग ते मोठे झाल्यावर व अकुशल मजूर तयार होतात. एकंदरच मग या साऱ्या गोष्टीचा वाईट परिणाम राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होत असतो ,कारण देशातील प्रत्येक नागरिक हा आपल्या उत्पादन क्षमतेनुसार देशाच्या विकासात हातभार लावत असतो .


गरिबीने कुपोषणाला जन्म दिला आहे व भारतातील गरिबी ही सामाजिक  असमानतेचे बाळ आहे , या सामाजिक असमानतेतुन निर्माण झालेल्या कुपोषणामुळे बालकाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाऊन ते इतर बालकाची बरोबरी करू शकत नाही. साधारणपणे साधारण बालक व कुपोषण ग्रस्त बालक हे मोठे झाल्यावर देखील त्यांच्या उत्पादन क्षमतेमध्ये जवळ - जवळ 10 ते 15 % (दहा ते पंधरा टक्के ) फरक आढळून येण्याची शक्यता असते . 



एकंदरीत आपण अशा निर्णयाप्रत येऊन पोहोचत असतो की ज्या  जमातीवर सामाजिक असमानतेचा वाईट परिणाम झालेला आहे , ज्यांना - ज्यांना हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे,  त्या - त्या काळी होत असलेल्या विकासापासून लांब राहिले होते , नव्हे त्यांना त्या-त्या काळातील मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते त्याच समाज घटकात आज कुपोषणाचे प्रमाण जास्त आढळून येत आहे .


 मानसशास्त्रीय दृष्ट्या एक माणूस असा विचार करतो की पृथ्वीतलावर सर्व माणसे समान आहेत परंतु प्रत्यक्षात समोर भेदाभेद सामाजिक असमानता तो पाहत असतो त्यावेळी एकूणच त्यांच्यावर सर्वांगिन विपरीत परिणाम म्हणजे त्याच्या शारीरिक ,मानसिक, वैचारिक , बौद्धिक , भावनिक व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो . अर्थात सामाजिक असमानतेचा परिणाम होत असतो .  भारतात सामाजिक असमानतेमुळे  कुपोषण वाढीस लागले आहे . जगातील सर्वाधिक कुपोषित बालके भारतात दिसून येतात . जगातील जवळपास एकूण कुपोषणग्रस्त मुलांपैकी 25 टक्के कुपोषणग्रस्त मुले भारतात आढळतात . आणि आणखी थोडे खोलात जाऊन जाती ,जमाती ,इतर मागास जातींचा विचार केला तर अनुसूचित जमातीमध्ये 28% ,अनुसूचित जातीमध्ये 21%, इतर मागास जाती 20 % आणि ग्रामीण समुदाय 21% कुपोषणग्रस्त आहे .


जोपर्यंत भारतात सामाजिक समानता येत नाही तोपर्यंत कुपोषणावर पाहिजे तेवढ्या प्रमाणात मात करता येणार नाही व कुपोषण  हद्दपार देखील करता येणार नाही . कुपोषण हे राजनैतिक व सामाजिक उतरंडीचा परिणाम आहे. जोपर्यंत कुपोषण राजनैतिक अजिंठ्याच्या प्रथम स्थानावर येत नाही व लोकांच्या डोक्यात घुसलेले असमानतेचे कीड निघत नाही तोपर्यंत  याचा नायनाट होणे शक्य नाही .



दिनांक 15 /02/ 2020. 

  10 अश्विनी पार्क वाघोदा शिवार नंदुरबार.


               हेमकांत मोरे .

            94 23 91 70 74.

0 Comments: