मनासारखी देखणी
विजो (विजय जोशी)

आजवर आयुष्यात
तशा उत्तमोत्तम अनेक भेटत राहिल्या
वेळोवेळी,
तरीही मनासारखी न मिळाल्याची खंत
आजही आहेच...
सर्वार्थाने सर्वांग सुंदर अशी भेटणं
तसं अवघडच,
तरीही
मनाला भावणारी
मनावर जादू करणारी
सतत ती सोबत असावी असं वाटणारी
कधीतरी एखादी जीवनात येईल
या आशेवर मी शोधत राहतो
पाठपुरावा करीत राहतो
अगदी निगुतीने...
मी फिरत राहतो सतत
सर्वत्र तिच्या शोधात,
जवळ येतेही एखादी
मनावर गारूड करीत,
पण तरीही
होत नाही समाधान
तिच्या परिपूर्णतेचं,
कुठेतरी जाणवत राहते सतत
तिच्यातली कमतरता...
आणि म्हणून
आजही शोधतो आहे मी
माझ्या मनासारखी
माझी परिपूर्ण देखणी "कविता"...!!
विजय जोशी
डोंबिवली (मालवण-सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२
२८/१०/२०२०




0 Comments: