उदयोन्मुख भारतीय समाज बांधणी साठी कायद्या सोबत नैतिकतेची आवश्यकता काळाची गरज

उदयोन्मुख भारतीय समाज बांधणी साठी कायद्या सोबत नैतिकतेची आवश्यकता काळाची गरज

 उदयोन्मुख भारतीय समाज बांधणी साठी कायद्या सोबत नैतिकतेची आवश्यकता काळाची गरज



 स्वाभाविकपणे कायदा हा समाजाचा पाया असतो व तोच राष्ट्राचे ऐक्य टिकवून ठेवत असतो .कायदा हे असे हत्यार आहे ज्याच्या सहाय्याने समाज वेळोवेळी अनिष्ट गोष्टी ,संकल्पना लांब करत असतो . ज्याच्याने मानवी समाजात नवी विचारप्रणाली तसेच नव मतप्रवाह निर्माण होत असतो. नियम तसेच कायदे माणसासाठी काय चांगले व काय वाईट हे ठरविण्यासाठी बनविलेले असतात. सामाजिक प्रगती ,उन्नती , कल्याण व सर्वसमावेशक राजकीय तथा सरकारी प्रणालीतुन तयार करण्यात आलेला कायदा हा हातात - हात घालून मार्गक्रमण मार्गक्रमण करणाऱ्या प्रक्रिया आहेत .



नैतिकता मानवी जीवनात फार अगत्याची व महत्वपूर्ण आहे .समजा एखाद्या मानवा जवळ विचार तसेच ज्ञान आहे ,परंतु नैतिकता नाहीतर ते विचार व ज्ञान मानवी शोषणासाठी कारणीभूत ठरू शकतात अथवा अन्यायासाठी  वापरले जाऊ शकतात . चालत्या गाडीच्या चाकाला चाक बाहेर पडू नये म्हणून अडकन असते त्याच अनुषंगाने मानवी जीवन सुपरिस्थितीत चालावे , लोकोपयोगी कामे होवोत , अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी कायदे निर्मिती अगत्याचे होत असते ,परंतु ते राबवणारे व पाळणारे यांची नैतिकता देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते .



मानवी जीवनाला कोणत्यातरी नैतिक तत्वाचा पाया असावा हे आपणाला मान्य असायला हवे संसारी जीवनाला नव्हे तर राजकारणाला ही  तो असला पाहिजे .सामान्य जनतेच्या मनात कायद्याविषयी फार मोठा गैरसमज पसरविण्यात एक विचारप्रवाह आज सफल होताना दिसत आहे . आपले कायदे कसे कमकुवत आहेत ते सर्वसामान्य जनतेचे कसे संरक्षण करू शकत नाही अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार केला जात असतो , त्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या ,योजना तयार केल्या जात असतात .आपल्या स्वार्थासाठी कायद्या मधून पळवाटा काढल्या जात आहेत.  संपूर्ण मानवी समाजाच आज कायदा कसा आपल्यासाठी कमकुवत आहे असा विचार करू लागला आहे,  परंतु तो कायदा , नियम योग्य प्रकारे समाजापर्यंत कसा नेता येईल या बाबतीत जबाबदार यंत्रणा अपयशी ठरत आहे.



 कायदे हे सामाजिक उद्देश पूर्तीसाठी , मानवी कल्याणासाठी ,एकमेकात एकोपा निर्माण करण्यासाठी तयार केलेले असतात तसेच पूर्णपणे  बंधुभाव निर्माण करून सामाजिक जीवन जगण्याचे आदेश देत असतात . सरकारने सामाजिक बाबतीत लोक प्रगतीच्या दृष्टीने इष्ट असणारे सामाजिक कायदे देखील नैतिकता हिन  लोक तोडफोड करायला मागेपुढे पाहत नाहीत, म्हणून जीवनात नीतिमत्तेला प्रथम प्राधान्य असले पाहिजे जोपर्यंत नीतिमत्तेला मानवी जीवनात प्रथम प्राधान्य मिळत नाही तोपर्यंत कितीही कायदे केले तरी त्याची पायमल्ली झाल्याखेरीज राहणार नाही.



कोणत्याही समाजसुधारणेसाठी कायद्याचे बंधन असणे आवश्यक असते परंतु या प्रकारचे लोक समाज जीवनात अल्प असतात . उलट बहुसंख्य लोकांना  नीतीमत्तेच्या धाकाने समाज जीवन सुस्थिर ठेवण्यास प्रवृत्त करता येते, त्यामुळे नितिमत्तेवर आधारलेला जनसमुदाय समाज जीवन सुस्थिर करण्याचे व समाज स्वास्थ्य टिकवून ठेवण्याचे मुख्य सूत्र  आहे. कारण कायद्याचे व नियमांचे यश हे सुजाण नागरिकांवर अवलंबून असते व सुजाण नागरिकांची नैतिकता शक्यतोवर  ढासळत नाही . कायदे हे  तरतुदींच्या व तत्वांचा नुसता सांगाडा असतो त्या सांगाड्यात रक्त मास म्हणजे नैतिकता असते. नुसते कायदे करून चालणार नाही तर ते पाळण्यात व राबविण्यात सुजाण नागरिकांची समाजव्यवस्थेत खुपच गरज होऊन बसली आहे.



 सामाजिक सुधारणा सरकारी कायद्यानेच घडून येत असतात परंतु सामाजिक सुधारणेची चळवळ मारण्यासाठी लोक वेगवेगळे  असमाजमान्य प्रयोग करत असतात , हे प्रयोग निरनिराळ्या वेळी,  निरनिराळ्या स्थळी व निरनिराळ्या लोकांकडून केले जात असतात.  योग्य त्या कायद्याची  अंमलबजावणीसाठी वरिष्ठ न्यायव्यवस्था आणि वरिष्ठ नोकरशाही न्यायप्रिय व नि:पक्षपाती असली पाहिजे , तरच सामान्य जनतेचा कायद्यावर विश्वास बसेल . राज्यव्यवस्थे सारख्या , समाज कल्याण सारख्या , समाज हीत सारख्या , जनहित सारख्या सर्वव्यापी व्यवहारात चूक झाली तर तिचे परिणाम साऱ्या मानवी समाजाला भोगावे लागतात म्हणून नैतिकतेला फार व अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत असते.  चुकणे हा जरी मनुष्य गुण आहे परंतु ती चूक दुरुस्त न करता तशीच पुढे चालू ठेवणे हे राष्ट्राला विघातक असुन नैतिकतेच्या  अव्यवहार्य कल्पना राष्ट्राला रसातळाला नेऊन सोडत असतात ते समजून घेणे अगत्याचे झाले आहे.



 दिनांक 9 /10/ 2020 .

10 अश्विनी पार्क वाघोदा शिवार नंदुरबार .



                हेमकांत मोरे.

             94 23 91 70 74 

             94 04 49 24 03

0 Comments: