आमची ढोरा .... आमची गुरे
आता गावात फार कमी लोक राहतात. सामसूम असते. माकडांचे राज्य झाले आहे.
त्यावेळी गाव म्हणजे चालते बोलते गोकुळ होते. सगळे शेतकरी होते. सगळे ढोरे पाळायचे. सकाळ सायंकाळी गावची पाणंद गुरांनी आणि त्यांच्या शेणाने भरून जायची.
गावात गरिबी होती. पण कोणीही आपली गुरे कसायाला विकत नसत. गुरे आजारी पडली, मोडली तर बायका डोळ्यात पाणी आणायच्या. आजारी पडलेली, म्हातारी झालेली गुरे दाव्यावर मरायची. मेलेल्या गुरांना लाकडी वाश्याला बांधून जवळच्या ओढ्यात किंवा नदीमध्ये सोडले जायचे. त्यांच्या तोंडात शेवटचा चारा दिला जायचा. नदिला पाणी असेल तर ते वाहून जायचे. नाहीतर गिधाडे त्याची विल्हेवाट लावायचे.
गुरांना चरायला नेणे हे काम सगळी शाळकरी मुले करत. पावसाळ्यात सकाळी थोडावेळ आणि सायंकाळी थोडावेळ आम्ही गुरांना चरायला न्यायचो. मधल्या वेळेत शाळेत जायचो.बाकी इतर आठ महिने शेतात पीक नसायचे. त्यामुळे गुरे राखायची गरज नसायची. सकाळी गुरांना रानात नेऊन सोडायचे. ती दुपारी आपोआप परत येत.
आम्ही गुरे चरायला न्यायचो तिथे गडनदी सुंदर काटकोनी वळण घ्यायची. पलीकडे जांभवड्याची साळगावकरांची घरे स्पष्ट दिसायची. सळसळ वाहणारी नदी आणि फोफावलेली भात शेती यांच्यामध्ये वाळूचे मैदान होते. त्यात थोडे दगड असायचे. तिथे बारीक गवत उगवायचे. तिथे गुरे चरायची.
मध्ये बसायला एक छोटे खडक होते.आम्ही गुरांचे राखणे क्रिकेट खेळायचो. लग्नात फिरवतात त्या लाठी काठी बनाटीचा सराव करायचो. गवताची टोपी वळायचो.
पुढे मी आठवी पासून गुरांकडे जाताना अभ्यासाचे पुस्तक घेऊन जायचो. खडकावर बसून जास्त पाऊस नसेल तर इमाने इतबारे अभ्यास करत बसायचो.
आमच्याकडे काळा , लाल्या, गवळ्या हे बैल होते. एक गाय होती. पिंकी नावाची पाडी होती.मोठेबाबांकडे म्हशी होत्या.
एकदा आमचे सुरेशकाका रानात बैल चरायला घेऊन गेले होते. तो बैल चरता चरता कापावरून ( कड्यावरून ) पडला आणि संपला. ते घरी रडत आले , असे मला आठवते. या प्रसंगावर मी एक कवितापण लिहिली आहे.
नांगरणी सम्पली की सर्वजण आपापले बैल राखणी साठी घाटावर पाठवायचे. त्या दिवशी सम्पूर्ण गावाचे बैल एका रांगेने सह्याद्री घाट चढायचे. राखण्या लोकांना पायाला जळवा चिकटायच्या.
आमच्या वाडीतील वसंत आनांच्या बैलाने एका घाटवळाला नको तिथे शिंग मारले होते. त्याला कोल्हापूरला न्यावे लागले. नशिबाने तो वाचला.
विज्ञाननिष्ठ सावरकर हे माझे आवडते नेते. त्यांनी देशासाठी यातना भोगल्या. मला अर्थात त्यांचे सगळे विचार पटत नाहीत.
ते म्हणतात, गाय हा फक्त उपयुक्त पशु आहे. त्यांनी कदाचित लहानपणी गुरे राखली नसतील, शेती केली नसेल. आम्ही गायी राखल्या , शेती केली. गाय ही आमच्यासाठी गोमाता आहे.
1999 पर्यंत आमच्याकडे बैल जोडी होती. मी MBBS ला असताना चार दिवस गावी येऊन उखळ नांगरणी करत होतो.
गवळ्या
गवळ्या हा आमचा बैल आमच्याच गोठ्यात जन्मला. तो पांढरा शुभ्र होता. मी लहान होतो तसा तो पण लहान होता. चरून आल्यावर तो गोठ्यात सरळ शिरायचा नाही. मग मला खूप धावपळ कसरत करावी लागायची.
मला खूप राग यायचा. मी त्याला दाव्याला बांधून काठीने खूप मारायचो. अर्थात मी लहान असल्यामुळे त्याला लागत नसेल किंवा लागत असेल. तो घाबरायचा हे नक्की.
मी मोठा झालो तेव्हा मी गवळ्याला विनाकारण मारायचो ते आठवले की खूप दोषी भावना मनात यायची. सगळ्यांच्या आयुष्यात विनाकारण काही दुःखे येतात, तशी माझ्या आयुष्यात पण आली. तेव्हा मी मनात म्हणायचो- तू गवळ्याला विनाकारण मारलेस, आता भोग.
माझ्याकडे टाइम मशीन आले तर मी माझ्या बालपणात परत जाईन. त्या बालपणात मी गवळ्याला मारणार नाही. मी त्याच्या पाठीवरून हात फिरवेन. मी त्याच्या गळ्याला मिठी मारेन.
डॉ सतीश पवार
कणकवली
29 dec 2020.
*****************************************************************************
कविता : पूर्वीचे दिवस
(डॉक्टर सतीश पवार यांनी लिहिलेल्या "आमची गुरे आमची ढोरा" हा लेख वाचून सुचलेली कविता)
ती आमची गुरे आणि आमची ढोरा
सतीश,लेख वाचून मनाक वाटला बरा
गवळ्याक मारला आता येता कळवळा
बालपणी नव्हता कळत सतीश बाळा
असो,सत्य बोलून मन केलस मोकळा!
ह्याच खरा मनाचा मोठेपणा आपला!
गाईचे महत्व विशद केले लई भारी
गोमाता असते, दुसरी जननी खरी
सगळ्या आठवणींनी मन गुरफटला
गावात पांणदीत फिरतय असा वाटला
तेव्हा जडेतडे दिसायचे शेणाचे सडे
पण आता मात्र दुर्मिळ झाले बापडे
गाई म्हशींनी भरलेले असायचे गोठे!
गावातले गोठे आता दिसेनात कोठे?
सगळा लिवताना माकाच येतत हुंदके
ऐकु येना नाय गाना,"आराडगे बांडके"
कवी संतोष गोपाळ सावंत (8779172824)
३०/१२/२०२०
( गवळयाक मारला - गवळ्या नावाचा बैल, पाणंद - जा ये करण्यासाठी असलेला रस्ता)
************************************************************************




0 Comments: