लगीन
सोर्गत म्हणजे नवऱ्याला नवरी बघणे. होकाल म्हणजे नवरी. होवये म्हणजे लग्नाचे गीत ( ओव्या). धेडा म्हणजे नवऱ्याबरोबर असणारा लहान मुलगा. धेडी म्हणजे नवरीबरोबर असणारी छोटी मुलगी. सनगा काढणे म्हणजे बस्ता . घिरट म्हणजे मोठे लाकडी जाते.
आमची आजी खूप होवया म्हणायची.मोठेबाबा वाडीचे फुडारी ( पुढारी) होते. त्यांना लग्नाच्या सगळ्या वाटाघाटीसाठी बोलवले जायचे.
आमच्या घरी माडीवर शिरोडकर फॉरेस्टर भाड्याने राहायचे. त्यांचे लग्न शिरोड्यात झाले. तेव्हा मी , बाबा आणि प्रभाकरनाना गेलो होतो. मी धेडा झालो होतो.
लग्नात मामाचे महत्त्व आजच्या प्रमाणेच मोठे होते.
लगीन म्हणजे एक दिवसाचे काम नव्हते. पाहुणे लोक 15- 20 दिवस अगोदर आणि नन्तर तळ ठोकायचे.
माझी आजी आणि कुडाळचे BDO विजय चव्हाण यांची आजी म्हणजे सख्या बहिणी. ती आजी एका लग्नात आमच्याकडे राहायला आली होती. मी लहान होतो. माझे नाव तिने ठेवले-- काशीनाथाचा चोटला! ते आठवले की आम्ही भावंडे हसून मरतो.
एका लग्नात माझी घोणसरीची आजी तिच्या दोन मैत्रिणीबरोबर रात्री दोन वाजता निघाली. हरकुळच्या मधल्या रस्त्याने ती सकाळी शिवडावला चालत लग्नाला पोहोचली. दुपारी लग्न आटोपून परत त्याच दिवशी चालत घोणसरी.
सोर्गत बघणाऱ्या माणसांनी एका मुलीची माहिती सांगितली. ती माझ्या बाबाना पटली. आमच्या दीपकदादासाठी ती मुलगी बघायची ठरली.दीपकदादा मुंबईत मिल मध्ये नोकरीला होता.
मुलीकडे जाऊन घर बघायचे ठरले. मुलीकडे जायला खाजगी गाडी ठराली.
आमचे दत्ताराम आजोबा एक गजाल सांगायचे.
एका मुलीला आणि तिचे घर बघायला मुलाकडची माणसे गेली. तेव्हा ती मुलगी त्यांना म्हणाली, "माझ्या बाबाचे वरचे बघा आणि माझ्या आईचे खालचे बघा." पाहुणे आ वासून बघायला लागले. मग कोणीतरी म्हणाले, 'अहो याचा अर्थ की हिच्या बापाने बांधलेले वरचे घर बघा आणि आईने खाली घातलेली कणी ( रांगोळी) बघा."
मुलीला बघताना मुलगी साडी नेसून बाहेर यायची. पोहे चहा असली भानगड नन्तर आली. अगोदर गुळ , कांदा आणि पाणी असायचे.
मुलीला काही प्रश्न विचारले जायचे. जेवण वगैरे येते की नाही. शेतीची सगळी कामे येतात की नाही , ही चौकशी व्हायची.
गाडीचा ड्राइवर वरच्या समाजाचा असायचा. तो आमच्या माणसांकडे जेवत नसे. मग त्याची सोय त्या गावच्या त्याच्या माणसांकडे करावी लागे.
मग मुलीकडची माणसे मुलाचे घर बघायला जायची. शेती भाती किती आहे, चाल चलवणूक कशी आहे याची चौकशी व्ह्यायची.
गावात भटाकडे जाऊन नावरस जुळते का ते विचारले जायचे.
नन्तर पसंद असेल तर नवऱ्याला कळवले जायचे. मग ठरावाची बैठक घेतली जायची. त्याला डाळीबैठक म्हणायचे कारण ती बाम्बुच्या डाळ या चटई वर व्हायची. त्या डाळी बौद्ध लोक बनवायचे. तेव्हा आताच्या चटई नसत. ती बैठक शक्यतो मुलीच्या घराकडे व्ह्यायची. त्या बैठकीला दोन्ही कडची माणसे असायची. त्यात सर्वांची ओळख करून द्यायची. त्यात देण्याघेण्याचे ठरायचे. ते सर्व उघडपणे सगळ्यांना सांगितले जायचे. लग्नाचा खर्च कसा करायचा ते सांगितले जायचे. बैठकीच्या शेवटी दोन्ही बाजूचा एक एक माणूस उभा राहून अमुक गावची पाताड्यांची पोरगी नरडवेच्या पवारांना दिली असे सांगून एकमेकाला मिठी मारायचे. रामराम ओ रामराम म्हणायचे.
ह्या बैठकीत ऐपत असेल तर लग्नपत्रिका कशा छापायच्या ते ठरायचे. काणेकर किंवा मर्गज प्रेसमध्ये लग्नपत्रिका छापल्या जायच्या. ऐपत नसेल तर नुसता नारळ हातात देऊन आमंत्रण दिले जायचे. तो नारळ परत घ्यायचा असतो.
मग नारळफोडणी म्हणजे साखरपुडा. परत सगळा ठराव सांगून दोन्ही बाजूंनी संमती आहे, असे सांगून नारळ फोडला जात असे. मुलाकडची एखादी अति हुशार म्हातारी म्हणायची, "पावण्यानो , नारळ अगदी बरोबर मध्ये फुटला पाहिजे." मग पाहुण्यांपैकी कोणीतरी उत्तर द्यायचा, " आजी तूच फोड ना". आजी गप्प!.
गावोगावी फिरून नातेवाईकांना आमंत्रण दिले जायचे. कपड्यांची खरेदी केली जायची. म्हणजे बस्ता . त्यांना सणगा काढणे म्हणायचे. ऐपतीप्रमाणे लोकांना कणकवली बाजारात कपडे घेतले जायचे.
आमच्या एका नातेवाईकाकडे लग्नात घालायला फुलपॅन्ट नव्हती. त्याने एका दिवसासाठी आमच्या नानांची फुलपॅन्ट उसनी घेतली होती.
लग्न नवऱ्याच्या गावात , त्याच्या अंगणात करायचे ठरवले गेले. याला व्होकाल नवऱ्याकडे उचलून जाते असे म्हणतात. अंगणाला खळे म्हणतात. खळ्यात बांबू आणि झाडाच्या पानांचा ( टाळ ) मांडव ( माटव ) असतो. त्याच्या एका खांबाला सावरीच्या खांबांची मुहूर्तमेढ सुतार बांधून द्यायचा. त्याला आंब्याचे टाळ बांधायचे. हळदीच्या दिवशी अगोदर मुहूर्त मेढ रंगवली जायची. हळद कुंकू लावून पाच सुवासनी त्याला टिकल्या लावायच्या. बायका होवया म्हणायच्या.
" दारातल्या गे म्हूरत मेढी
तुझ्यावर भार कैशाचा
मजवर भार कुंकुवाचा
मजवर भार हळदीचा
मजवर भार नारळाचा
मजवर भार मांडवाचा "
खळे सारवले जायचे. आम्ही पोरे माटवाच्या वरच्या बाजूला चारी बाजूने दोरे बांधून त्याला आंब्याची पाने अडकवायचो. रंगीत पताका लावायचो. घर रंगाने रंगवायचो.
लग्नासाठी मुंबईवरून खास बेंजो पार्टी आली होती. आमच्या गावातील ती पहिली बेंजो पार्टी. ते लोक महिनाभर गावात राहिले. दुपारी नदीत पोहायला जायचे. सकाळ सायंकाळ बेंजोचा सराव करायचे. त्या आवाजाने जगूआबांच्या गायी बिथरत आणि दूध देणे थांबवत असत. मग जगुआबा वाजप बंद करायला सांगत. सगळे वाजप बंद व्हायचे. तरी एखादा खोडकर वाजपी मुद्दाम एक वाद्य वाजवायचा. जगुआबा गोठ्याच्या बाहेर यायचे आणि त्याचा समाचार घ्यायचे.
बेंजो पार्टीने मला भुरळ घातलेली होती. मी मोठा झाल्यावर MBBS होणार आणि बरोबर बेंजोपण वाजवणार असे ठरवले होते.
लग्नाच्या आदल्या दिवशी बायका घिरटीवर भात भरडायच्या. होवया म्हणायच्या. जात्यावर धुवून सुकवलेले तांदूळ वड्यासाठी दळायच्या.
सायंकाळी माटवात दिवा लावला जायचा. होवया म्हणत व्हायनामध्ये हळद कुटली जायची. ती हळद नवऱ्याच्या अंगाला पहिल्यांदा पायापासून लावत वर येत डोक्याला लावली जात असे.
**
लग्नाचा दिवस
साटमाचा ट्रक सकाळी सहा वाजता व्हकलेच्या घरी दाखल व्हायचा. सगळे नवीन कपडे घालून तयार. ट्रकच्या केबिनमध्ये बसायला चढाओढ लागायची. मग बाकीचे गपचूप मागच्या भागात चढुन बसायचे. काही हौशी मुले टपावर ( top) चढून बसायची. ट्रक मालक ओरडून सांगायचा, खाली बसा. पण काही लोक उभे राहायचे. आधारासाठी दोऱ्या होत्या.
ट्रक कसाल बाजारात यायचा. ड्युटीवरचा हवालदार मागून शिटी मारत जोरात स्कुटरने यायचा आणि ट्रक थांबवायचा. मालक त्याचा खिसा गरम करायचा.
नवरीचा ट्रक नवऱ्याच्या गावी यायचा. मग पुढची कामे चालू व्ह्यायची.
नवरीची माणसे वाडीतील दुसऱ्या घरात उतरायची. तिथे नवरीला हळद घालणे कार्यक्रम व्हायचा.
नन्तर पुण्यवचन म्हणजे घाणे भरणे. यात नवरा , त्याचे आई वडील भटजी बरोबर पूजेला बसायचे. नन्तर नवरी आणि तिचे आईवडील बसायचे. पान विडा ठेवून पूजा व्हायची.
मग कूळ ठेवणे . दिवाबत्ती हातात घेऊन, रवळीत ओटी घेऊन कुल देवतेच्या नावाने कूळ ठेवायचे.
नन्तर आपापल्या माटवात नवरा नवरीला परत हळद घातली जायची. सावरीच्या पाच काठ्याच्या खाली पाच सुवासिनी अंघोळ घालत.त्याला निम सांडणे म्हणत.
पोशाख करून नवरा पाच माणसांबरोबर जेवायला बसायचा. त्याला उष्टावळ म्हणत. त्यानन्तर नवरा लग्नाला तयार होऊन मंडपात जायचा.
पाच मंगलाष्टके झाली की व्होकाल मंडपात यायची. नवरा नवरी लग्नाला उभी राहायची. भटजी मंगलाष्टके म्हणायचे. आमचे मोठेबाबापण म्हणायचे. "आली लग्न घटी समीप " म्हणून वाजंत्री बहु गलबला न करणे म्हटल्यावर वाजंत्री मोठंमोठ्याने वाजायला सुरुवात व्हायची. तांदळाच्या अक्षता पडायच्या.
नवरानवरी एकमेकाला हार घालायच्या. मामाने उचलून घेणे ही पद्धत नव्हती. कोणाचा कॅमेरा असला तर फोटो काढायचे नाहीतर नाही. दिगवळ्याच्या माणसाचा लाऊडस्पीकर असायचा.
मग त्याच खळ्यात खाली मांडी घालून जेवणाची पंगत बसायची. जेवण बकऱ्याचे असायचे. कोणी शाकाहारी माणूस नसायचा. वाढायला वाडीतली काही माणसे असायची.
मोठेबाबा आणि मंडळी जेवणापूर्वी श्लोक म्हणायचे.आम्ही पण श्लोक म्हणायचो.
"शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे."
"मंडप घालुनी घोष लोम्बती
रंग शिंपडुनी चित्रे काढिली
आत बैसल्या विष्णू पंगती
पाची पक्वाने वाढी द्रौपदी"
मग "सीताकांत स्मरण जानकी जीवन हर हर महादेव" असा गजर व्हायचा.
यजमानी जेवा म्हणून हुकूम द्यायचा. आता श्लोक इतिहासजमा झाले.
जेवताना मटण आणि बंगो म्हणजे रस्सा संपायचा.मग आचारी मंडळी तिखट मीठ पाणी टाकून वाढवायचे. वऱ्हाडी मंडळी ते पण मागून मागून घ्यायचे.
नवरा नवरी अहेराला बसायची. आहेर सम्पला की नवरीकडची माणसे गावी जायला निघायची. रडारड, मिठ्या मारणे चालू होतं असे. नवरी बरोबर पाठराखण करायला एखादी बहीण थांबायची.
मध्येमध्ये मानपानावरून खूप भांडणे व्हायची . जाणते लोक ती मिटवायचे.
संध्याकाळी वरात. गॅसबत्ती पेटवली जायची. आणि वरात पूर्ण गावातून फेरी मारायची. मध्ये गावाचे लोक आंब्याच्या डहाळीचे तोरण उभे करायचे . नवरा नवरी त्याखालून जायची. जो तोरण बांधेल त्याला यजमानी पाच दहा रुपये द्यायचा.
वरातीमध्ये सायकलवर बॅटरी बांधून बेंजो पार्टी चालायची. आम्ही पोरे खूप नाचायचो. एक पाहुण्यांची पोरगी जादा शहाणपण करत नाचायची. मग आमचा आबुनाना नाचता नाचता तिच्या पायावर पाय द्यायचा. पोरगी थंड!
मध्ये वरात थांबायची. विठ्ठल आपा लाठीकाठी बनाटी फिरवायचा. बनाटी डोळ्यांना दिसणार नाही अशा अचाट वेगाने फिरायची. त्याचा मुलगा डोक्यावर नारळ घेऊन बसायचा. विठ्ठल आप्पा दारू पिऊन फुल असायचा पण डोक्यावरचा नारळ बरोबर फोडायचा.
फोंडयाचा सदाशिव दारू पिऊन धिंगाणा घालायचा. कोणाला ऐकायचा नाही. मग त्याची बायको त्याच्याच कमरेचा पट्टा काढायची आणि सगळ्यांसमोर त्याला जीव जाईपर्यंत मारायची.
दमून भागून वरात रात्री उशिरा घरात यायची.
घरप्रवेश करताना नवरीला उखाणा घ्यावा लागायचा.
"चांदीच्या आरशाला हिरेमोती जोडले
दीपक भरतारासाठी आईबाप सोडले".
नवरा उखाणा घ्यायचा,
" हत्तीच्या आंबारीला सोन्याची झुल
कोमल नवरी दिसते गुलाबाचे फुल"
पाच सुवासिनी हळदीकुंकू लावायच्या. नवरी तांदळाचे उंबर्यावरील माप उजव्या पायाने पलटी करायची आणि आत यायची. पहिला नमस्कार घरच्या देवाला आणि नन्तर घरातील मोठ्या माणसांना.
शेवटी बाशिंग उतरवले जायचे. ते पाशीटाच्या उभ्या खांबाला म्हणजे मोराव्याला बांधले जायचे.
**
दुसऱ्या दिवशी नवरा नवरी समोरासमोर बसायचे. नवरा नवरीचे नवीन नाव तांदळाने भरलेल्या ताटात लिहायचा.
काही खेळ खेळले जायचे. ताटामध्ये हळद पाणी घेऊन आत अंगठी टाकली जायची. ती नवरा नवरीपैकी ज्याला सापडेल तो जिंकला.
नवरा नवरीने मूठ घट्ट बांधायची आणि एकमेकांची मूठ सोडायचा प्रयत्न करायचा. जो मूठ सोडवेल तो जिंकला.
हळद उतरवली जायची. म्हणजे पहिले डोके शेवटी पाय अशा उलट्या मार्गाने हळद लावायचे.
लग्नानन्तरची पूजा आताएवढी कॉमन नव्हती.
**
ती रात्र नवरा नवरीची पहिली रात्र असायची. त्यांना वळईमध्ये अंथरूण करून दिले जायचे. रात्र साजरी व्हायची.
दुसऱ्या दिवशी नवरा नवरी ओसरीवर म्हणजे लोट्यावर बोलत बसायची. तिथे वाडीतील संतोष यायचा. म्हणायचा, "सतीश काल खूप पाऊस लागला काय रे? खूप चिखल झाला आहे." मला कुठे चिखल झालेला दिसत नसायचा. मी विचारात पडायचो. नवरा म्हणजे दादा हसायचा.
**
पुढच्या दिवशी दादा वहिनी आणि घरातील माणसे मधल्या रानातील वाटेने सोनवड्याला मामाच्या देवाकडे जायची. ते जंगल पाहून नवी वहिनी बावरायची. तिला माहेरची याद यायची. ती रडायला लागायची.
काही दिवसांनी वहिनीच्या माहेरची दोन माणसे यायची आणि दादा वहिनी व आमच्या काही लोकांना त्यांच्या गावी घेऊन जायची. मटण जेवण करून सरबराई करायची. त्याला पाच परतावन म्हणतात.
**
आता माझी शाळा चालू व्हायची. दादाची पण सुट्टी सम्पली असायची. आज सायंकाळी दादा वहिनी नरडवे परेल ST गाडीने मुंबईत जायला निघतात. मी शाळेत जाताना वहिनी मला म्हणते, "भावोजी आम्ही निघणार संध्याकाळी. तुम्ही चांगला अभ्यास करा."
मला वहिनी आवडलेली असायची. तिने आणि दादाने मुंबईत जाऊ नये, असे मला वाटत राहायचे.
डॉ सतीश सदाशिव पवार
श्रीमती शुभांगी सदाशिव पवार
कणकवली
14 फेब 2021
सर्व नावे काल्पनिक आहेत.




0 Comments: