कोयलिया बोले अंबुवा डाल पर
डॉ सतीश सदाशिव पवार
आज मी झाडांबद्दल लिहिणार आहे कारण मी माझ्या आयुष्यातील माणसांबद्दल लिहिले की कोणतरी मला पिडतोच. मी काहीतरी वेगळे लिहिले असते आणि त्याने काही वेगळे वाचले असते. त्यांची समजूत घालताना मला नाकी नऊ येतात.
कोणाबद्दल चांगले लिहावे तरी कुठूनतरी दोघेजण उभे राहतात आणि म्हणतात, " सतीश तो माणूस डॅम्बिस होता. तू कसे काय चांगले लिहिलंस". मी त्यांना तुम्हीपण लिहा असा सल्ला देतो.
**
आमच्यावेळी आमच्या नरडवे गावात हापूस आंबे नव्हते. फक्त रायवळ म्हणजे गावठी आंबे होते. त्यातले काही रायवळ आंबे एवढे किमती वाटायचे की मालक त्याला कुंपण करायचे.
लहानपणी आमचे सहदेवनाना आम्हाला लहान पोरांना घाबरवायचे.' पोरानो गप्प बसा. आज आपल्या वाडीत राणी येणार आहे'. आम्हाला वाटायचे राजाची राणी येणार आहे. पण जी राणी यायची ती बिचारी साधी कोणीतरी राणे नावाच्या माणसाची बायको असायची.
असेच एकदा आम्ही एका राणे नावाच्या माणसाचे आंबे काढायला गेलो. आमच्यातला एकजण झाडावर चढला ,आम्ही खाली. तेवढ्यात मालक आला आणि आम्हाला ओरडला. आमच्याकडे होते ते आंबे काढून घेतले. झाडावर चढलेला मुलगा फांदीमध्ये लपून बसला. तो मालकाला माहीत नव्हता. मी मुर्खपणे वरती झाडाकडे पाहत राहिलो. त्यावरून मालकाने ताडले की कोणीतरी वरती झाडावर चढला आहे. त्याला तो वरचा मुलगा दिसला. त्याला खाली उतरायला सांगितले आणी मालकाने त्याला आमच्या त्यावेळच्या भाषेत हग्या दम दिला (म्हणजे जबरदस्त दम ). त्या मुलाने घरी परतल्यावर मी वर बघत होतो म्हणून मला फैलावर घेतला.
फेब्रुवारीमध्ये आंब्याला बारीक फळे लागायची. त्याला आम्ही तोरे म्हणायचो. आम्ही मुले ते बारीक कच्चे आंबे किंवा कैऱ्या तोडायचो आणि कापून त्याला तिखट मीठ लावून खायचो. त्याला खिरमाट म्हणायचे. हा कार्यक्रम कुठल्यातरी गोठ्यात किंवा गवताच्या तनसीमागे व्हायचा. (तनस म्हणजे गवताचा मोठा ढीग).
आमच्या वाडीत नदीकडे जाताना प्रकाश पवारचा एक गोड आंबा होता. आम्ही बॅट बॉल खेळायचो आणि वाऱ्याने पिकलेला आंबा कधी खाली पडतो त्याची वाट बघायचो. आंबा पडला की जो धावेल आणि आंबा ताब्यात घेईल त्याचा आंबा.
आंबा धुवून खायची पद्धत नव्हती.
दुसऱ्या बाजूला एक चिखलातल्या सावंतांचा गोड आंबा होता.
म्हातारीच्या व्हाळाच्या बाजूला एक हडकुळा आंबा आहे. तो पण फार गोड होता. आता तो म्हातारा झाला आहे. फळ धरत नाही.
एक मिरमिरा आंबा होता. तो खाल्ला की तोंडात मिरमिरीत चव यायची.
एक खोबरी आंबा होता. तो अगदी नारळाच्या खोबऱ्यासारखा लागायचा.
बिटकी म्हणजे छोटा आंबा. हा खूप गोड लागायचा. आम्ही दुपारचे उनातानातुन फिरायचो आणि आंबे घेऊन यायचो. एका दुपारी मी बिटकी खाली उभा राहिलो. मित्र वर चढला. त्याला वर काय दिसले काय माहित पण तो घाबरुन खाली उतरला. काय दिसले ते त्याने मला सांगितले नाही.
एक साखरी आंबा होता. तो साखरे सारखा लागायचा.
काही आंबे पाऊस जवळ आला तरी पिकत नसत. हे आंबे बाबा लोणचे घालायला वापरायचे.
हापूस आंब्याला कलमाचा आंबा म्हणायचे. मी घोणसारीला मामाकडे जायचो तिथे कलमी आंबा होता.
आम्ही झाडावर चढायचो किंवा दगड मारून आंबे पाडायचो किंवा एक मोठी बांबूची काठीने आंबे पाडायचो. त्याला गक्या म्हणायचे.
काही झाडांवर हुंमले म्हणजे मोठे डोंगळे असायचे. कधी कधी मधाचे पोळे असायचे. एखादया झाडावर सापाने टाकलेली कात दिसायची मग आम्ही घाबरून गार.
घरामध्ये चांगले आंबे गवतात पिकायला ठेवायचे. त्याला आढी म्हणायचे.
कधीकधी आम्ही सकाळी लवकर उठायचो आणी सगळीकडे फिरून रात्री खाली पडलेलं आंबे गोळा करायचो.
एकदा मी पिके आंबे घेऊन घरी येत होतो. मला एक फिरता चादर विक्रेता भेटला. त्याने माझ्याकडे आंबे मागितले आणि त्यांचे पैसे देतो असे म्हणाला. मी आंबे दिले पण त्याने मात्र पैसे दिले नाहीत.मी हात हलवत घरी आलो.
**
आता गावठी आंब्याला कोण कुत्रेपण हात लावत नाहीत. मुलांना झाडावर चढता येते की नाही हा प्रश्न आहे. हापूस आंबा भरमार झाला आहे.
डॉ सतीश सदाशिव पवार
कणकवली
12 फेब 2021.
कोयलिया बोले अंबुवा डाल पर
ऋत बसंत को देत संदेसवा
नव कालियन मे गुंजत भवरा
उनके संग करत रंग रलीया
यही बसंत को देत संदेसवा.





0 Comments: