बायको
विजो (विजय जोशी)
समजून घ्या उमजून घ्या
कशी आहे आपली बायको,
लग्नापुर्वी स्वप्न रंगविली
तेवढी सोपी नसते बायको
न मागताही अचानक
हातात येतो चहा जेव्हा,
पुढच्या क्षणी मागणी येणार
येवढं पक्क ध्यानात ठेवा
आई बहीण काकू मामी
वठवते साऱ्या भुमिका फार,
नवरा कुठे चुकल्यावर
शब्द शस्त्र होतात स्वार
नसते बायको घरी जेव्हा
फिरू नका मोकळं रान,
चुका तुमच्या शोधण्याचं
असतं तिला मोठं वरदान
ती बोलते जेव्हा भडभडून
तिला तिचं बोलू द्यावं,
शांत राहून सय्यम ठेवून
सारं काही ऐकून घ्यावं
ठेवा तिला प्रसन्न
देव महंत हेच सांगतात,
ती अस्वस्थ असते तेव्हा
घरात भांडी बोलू लागतात
देवांनीही हात टेकले
आपली वेगळी नाही गोष्ट,
तिन्ही लोकी सिद्ध आहे
स्त्री हट्ट हाच श्रेष्ठ
तिला खूश ठेवण्याचं
नाही विज्ञान नाही शास्त्र,
गजरा हाती देऊन पहा
दुसरं नाही जालीम अस्त्र
नका राहू मुठीत तिच्या
पण ठेवा तिला तुमच्या मिठीत,
सुखी संसाराचे हेच
अंतिम सत्य आणि गुपित
(टीप - आपापल्या जबाबदारीवर घरी वाचून दाखवा).
■■■
© विजो
विजय जोशी
डोंबिवली (मालवण - सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२
२१/०८/२०२०





0 Comments: